ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीच्या मिटींगला अखेर मिळाली तारीख; आता मंगळवारी 1 सप्टेंबर चा मुहूर्त जाहीर
महाज्योतीला नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मुलींच्या प्रशिक्षण केंद्रासाठी जागा
ओबीसी समाज घटकांना व विद्यार्थ्यांना समितीकडून अपेक्षा
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने, राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीप्रमाणे,तसेच मा. मुख्यमंत्री यांना लेखी पत्र दिल्यामुळे राज्यात दुसर्यांदा ओबीसी उपाययोजना मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना , राज्याचे महसुल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली.या समीतीमधे राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ, मंत्री मा. ना.श्री. गणेश नाईक,मंत्री मा. गुलाबराव पाटील,
मंत्री मा.ना.संजय राठोड मंत्री मा. ना.पंकजाताई मुंडे, ओबीसी मंत्री मा. ना. अतुल सावे व मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे या ओबीसी समाजामधील मातबर मंत्रीमहोदयांचा समावेश आहे.
या ओबीसी उपाययोजना मंत्रीमंडळ उपसमितीच्या माध्यमातुन,ओबीसी समाज, ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनी,ओबीसी साठी निर्माण झालेल्या महाज्योती व त्यांचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थींनी, ओबींसींची महामंडळे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना, ओबीसींची शासकीय वसतीगृहे व त्यांची बांधकामे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा विद्यार्थीभिमुख विस्तार आदि ओबीसींच्या कल्याणाची कामे या मंत्रीमंडळ उपसमितीमधे निर्णय घेवुन, त्याची शासन स्तरावर अंमलबजावणी करणे, तसे शासन निर्णय काढणे, व मुख्यमंत्री महोदयांच्या मंत्रीमंडळ बैठकीत हे मांडणे अपेक्षित आहे.
आता या ओबीसी उपाययोजना मंत्री मंडळ उपसमितीची चौथी बैठक मंगळवारी दिनांक 1 सप्टेंबर 2026 ला दुपारी 3 वाजता मंत्रालयात होत आहे. या मिटिंग साठी संबंधित विभागाचे प्रमुख यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिलेले आहे
ओबीसी संघटनांनी, विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपले शिक्षण प्रशिक्षण विषयक प्रश्र्न महाराष्ट्र शासनाकडे व या मंत्रीमंडळ उपसमितीकडे पाठविलेले आहेत.ओबीसी आंदोलक व चळवळीचे अभ्यासक प्रा. दिवाकर गमे यांनी सुध्दा हेच प्रश्र्न सविस्तरपणे या समितीचे अध्यक्ष मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे व मंत्रीमंडळ सदस्य यांचेकडे पाठवुन, राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ साहेब, यांनी पाठपुरावा करावा अशी ओबीसींच्या वतीने विनंती केलेली आहे
वसतीगृहात राहणार्या ओबीसी विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, ओबीसींच्या शासकीय वसतीगृहासाठी जागा व बांधकाम, महाज्योतीची प्रादेशिक कार्यालये व त्यासाठी शासकीय जागा व निधी, *महाज्योतीच्या नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी एनडीए सैनिकी व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी १० एकर जागा मिळणे,* महामंडळांना निधी मिळणे , आदि ओबीसींचे अनेक प्रश्र्न प्रलंबित आहे, ओबीसी उपाययोजना मंत्रीमंडळ
उपमसितीचे अध्यक्ष मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित जिल्हाधिकारी, अधिकारीव संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष बोलावुन, हे प्रश्र्न मार्गी लावावे, अशी ओबीसी संघटनांनी निवेदनातुन मागणी केलेली आहे.
या ओबीसी उपाययोजना मंत्री मंडळ समिती समोर, अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा विषय आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्म ग्राम येथील 200 मुलींचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए चे महाज्योती संस्थेचे प्रशिक्षण केंद्रासाठी व बांधकामासाठी महसूल विभागाची मागितलेली 10 एकर जागा मिळणेबाबत.* महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाचीच स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला , हे प्रशिक्षण केंद्र राज्याचे जेष्ठ मंत्री मा. ना. श्री छगनराव भुजबळ यांच्या प्रचंड पाठपुराव्यामुळेच महाराष्ट्र शासनाने मंजूर केले. व तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी या स्थळाचे व प्रशिक्षण केंद्राचे महत्व लक्षात घेऊन तात्काळ 7 मार्च 2022 लाच शासन निर्णय काढून हे प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून, त्यासाठी महाज्योतीला तात्पुरते 24 कोटी रुपये सुद्धा देण्यात आलेले आहे.
परंतु जागेअभावी महाज्योतीचा हा प्रकल्प थांबलेला होता. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारका पासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या वडगाव ग्रामपंचायती क्षेत्रामधील महसूल विभागाची 10 एकर जागा महाज्योतीने जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे दिनांक 20ऑगस्ट 2024 ला रितसर मागणी केली, मा, जिल्हाधिकारी यांनी नियमप्रमाणे जिल्हा परिषद सातारा सह सर्व विभागाची ना हरकतपत्रे दिनांक 31.12.2024 प्रमाणे मागितली, सर्व विभागानी ती दिली. परंतु जिल्हा परिषद सातारा यांनी ग्रामपंचायत वडगाव चे कारण दाखवून ते अजून दिले नाही, वास्तविक वडगाव गावाच्या ग्रामसभेने एकमताने ठराव करून ही जागा या शैक्षणिक संकुलासाठी देण्याचा ठराव केलेला आहे. तरी पण राजकीय वर्चस्व वादापायी नवीन ग्रामपंचायत्ती पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून अडवणूक सुरु आहे.
महाज्योतीने मागितलेली जागा ही शासनाच्या महसूल विभागाची असून ती शासनाच्याच महाज्योतीला अभिनव अशा मुलींच्या शैक्षणिक कार्यासाठी द्यावायची आहे, असे असतांना या समितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री असल्यामुळे त्यांनी ही जागा प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी महाज्योतीला द्यावी, अशी अपेक्षा आहे.
या शिवाय ओबीसीचे, विदयार्थ्यांचे व युवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्या शिष्यवृत्त्या, वसतिगृहे निर्वाह व भोजन भत्ते यांची वेळोवेळी पूर्तता व्हावी यासाठी समितीकडून संबंधितांना निर्देश देण्यात यावे, समितीच्या नियमित मीटिंगला व्हाव्यात अशी ओबीसी संघटनानी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.







