पुणे | 23
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या (एम-सेट) आयोजनासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. येत्या २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
विद्यापीठाने २१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रकटनानुसार, परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपापली प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षार्थींनी या सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचेही प्रकटनात नमूद करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेपूर्वी निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रकटनाद्वारे माहिती स्पष्ट केली असली, तरी परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ, तांत्रिक अडचण किंवा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा विविध संघटनांनी व्यक्त केली
आहे.





