पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कॉक्रोच जनता पार्टी, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्तीची भावना जागृत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.हा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील बाजूस आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी सहभागी नागरिकांनी स्वतःचा तिरंगा ध्वज घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १० वाजता वेळेवर सुरू होणार असून उपस्थितांनी शिस्तबद्धपणे उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमादरम्यान छायाचित्रे व व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर तिरंगा ध्वजाचा सन्मान राखून तो व्यवस्थित जतन करावा आणि ध्वज जमिनीवर टाकू नये, अशी विशेष सूचना देण्यात आली आहे.
“एक सूर, एक देश” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कार्यक्रमासाठी जितेंद्र कविरे, राहुल ससाणे आणि कुशल गुप्ते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आयोजकांनी म्हटले आहे.







