अमरावतीच्या सायलीची जागतिक झेप; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकाची लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंगसाठी निवड
पुणे, दि. ४ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स विभागातील वरिष्ठ संशोधन फेलो तथा भौतिकशास्त्र विभागातील पीएच.डी. संशोधक कु. सायली नीलिमा राजेश अतकरे हिची जर्मनी येथे आयोजित करण्यात आलेल्या ७५ व्या लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंग**साठी भारतातून निवड झालेल्या अवघ्या अकरा युवा संशोधकांमध्ये निवड झाली आहे. जगभरातील हजारो युवा संशोधकांमधून अत्यंत कठोर आणि बहुपदरी निवड प्रक्रियेनंतर मिळालेल्या या यशामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मूळची अमरावती येथील असलेल्या कु. सायली अतकरे या विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स विभागात डॉ. श्वेता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून कार्यरत आहेत. त्या Metal–Organic Frameworks (MOFs) आधारित प्रगत नॅनोमटेरियल्सचा वापर करून पर्यावरणातील विषारी प्रदूषक ओळखण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर्स विकसित करण्याच्या संशोधनावर कार्यरत आहेत. पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि आधुनिक सेन्सर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. या परिषदेदरम्यान त्यांना MOFs या विषयातील जागतिक ख्यातीचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. ओमार याघी यांच्यासोबत संवाद साधण्याचीही संधी लाभली.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना कु. सायली अतकरे म्हणाल्या, “मोठ्या शहरात किंवा नामांकित संस्थेत शिकल्याशिवाय जागतिक स्तरावर यश मिळत नाही, हा समज चुकीचा आहे. मेहनत, जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास असेल, तर छोट्या शहरातूनही जगातील सर्वोच्च व्यासपीठापर्यंत पोहोचता येते. माझ्या या यशामागे माझ्या आईची शिस्त, कुटुंबाचा विश्वास आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केले, तर जागतिक संधी निश्चित मिळू शकतात.”
सायली अतकरे यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. श्री समर्थ हायस्कूल, ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधनास सुरुवात केली.
त्यांच्या निवडीबाबत संशोधन मार्गदर्शिका डॉ. श्वेता जगताप म्हणाल्या, “सायली ही अत्यंत जिज्ञासू, अभ्यासू आणि सातत्यपूर्ण परिश्रम करणारी संशोधक आहे. संशोधनातील उत्कृष्टतेसाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक दृष्टी आणि चिकाटी तिच्याकडे आहे. लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंगसारख्या जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा तिच्या गुणवत्तेचा सन्मान आहे. ‘केमिकल सोसायटी रिव्ह्यूज’सारख्या उच्च प्रभावी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात तिचे संशोधन प्रकाशित झाले असून, देशभरातील विविध वैज्ञानिक परिषदांमध्येही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचे हे यश विद्यापीठासाठी आणि विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”
इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स विभागाचे विभागप्रमुख प्रा. वि. ल. मठे यांनी सायली अतकरे यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, अमरावतीसारख्या शहरातून शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करत जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वैज्ञानिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे, ही विद्यापीठासाठी गौरवाची बाब असून ती देशभरातील युवा संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे.
लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंग ही जगातील सर्वात प्रतिष्ठित वैज्ञानिक परिषदांपैकी एक मानली जाते. १९५१ पासून जर्मनीतील लिंडाऊ येथे आयोजित होणाऱ्या या परिषदेत नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आणि जगभरातील निवडक युवा संशोधक एकत्र येऊन विज्ञानातील नवीन दिशा, जागतिक आव्हाने, संशोधनातील संधी आणि भविष्यातील वैज्ञानिक प्रगती यांवर विचारमंथन करतात. या परिषदेसाठी निवड होणे हे कोणत्याही युवा संशोधकासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जाते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन परंपरेला साजेशी ही कामगिरी असून, विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.






