प्रा. हरि नरके यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त:
पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि सामाजिक जाणिवेचे भाष्यकार प्रा. हरि नरके यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
प्रा. हरि नरके यांनी आपल्या प्रभावी लेखनातून महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समाजामध्ये प्रभावीपणे प्रसार केला. सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांची त्यांनी सातत्याने मांडणी केली. त्यांच्या विचारांची आणि लेखनाची परंपरा पुढे नेणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला विशेष वैचारिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, साहित्यिक राजन खान, लेखक राजन गवस, संगीताताई नरके, प्रमिती नरके, ॲड. मृणाल ढोले पाटील, ॲड. मंगेशजी ससाणे, सौ. सुनीताताई भगत आणि ॲड. गौरी पिंगळे अनिल नरके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हरि नरके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रा. हरि नरके यांचा मोठा चाहतावर्ग, थोर लेखक, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. हरि नरके यांच्या विचारांना आणि सामाजिक कार्याला अभिवादन करताना त्यांच्या लेखनातून निर्माण झालेली वैचारिक चळवळ पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ या पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक भूमिकेचा, तसेच मनुस्मृती दहनामागील ऐतिहासिक, सामाजिक आणि वैचारिक संदर्भांचा चिकित्सक वेध घेण्यात आला आहे.
प्रा. हरि नरके यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लाभलेली उपस्थिती ही कार्यक्रमाची विशेष बाब ठरली. प्रा. हरि नरके यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली.






