महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची तातडीने नियुक्ती करा; २० ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा
पुणे प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून, विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अध्यासन केंद्रामध्ये आज स्वच्छतेचा अभाव आहे. केंद्रातील साहित्य धूळ खात पडले असून, अनेक साहित्य उंदरांनी कुरतडलेले आहे. केंद्राची नियमित देखभाल व देखरेख केली जात नसल्याने महापुरुषांच्या नावाने असलेल्या या अध्यासन केंद्राची अक्षरशः दुरवस्था झाली आहे.
या गंभीर परिस्थितीविरोधात **नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)**च्या वतीने २४ जून २०२५ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने अध्यासन केंद्राची स्वच्छता करून ते पूर्ववत सुरू करण्याचे तसेच अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १७ जुलै २०२५ रोजी अध्यासन केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास एक वर्ष उलटले तरी अद्याप अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
केवळ जाहिरात काढणे आणि नियुक्ती प्रक्रिया सुरू करणे पुरेसे नसून, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना समर्पित असलेले हे अध्यासन केंद्र प्रत्यक्षात कार्यरत करणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. महापुरुषांच्या नावाने कार्यक्रम घेणे, त्यांच्या विचारांचा गौरव करणे आणि दुसरीकडे त्यांच्या नावाने असलेले अध्यासन केंद्र दुर्लक्षित ठेवणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या संपूर्ण विषयाची गंभीर दखल घेत आज नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. अध्यासन केंद्र प्रमुखांची तातडीने नियुक्ती करावी, केंद्राची स्वच्छता व देखभाल नियमितपणे करावी आणि अध्यासन केंद्राचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेले अध्यासन केंद्र वर्षानुवर्षे बंद ठेवणे आणि जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास एक वर्ष उलटूनही अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज आम्ही प्र-कुलगुरूंची भेट घेऊन विद्यापीठ प्रशासनासमोर आमची भूमिका स्पष्ट केली आहे. २० ऑगस्टपर्यंत अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती करून केंद्राचे कामकाज सुरू झाले नाही, तर आम्ही शांत बसणार नाही.”
— सिद्धांत जांभुळकर, NSUI
दरम्यान, ओबीसी आंदोलनाचे दिवाकर गमे यांनीदेखील अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला २० ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
“महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेले अध्यासन केंद्र वर्षानुवर्षे बंद असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विद्यापीठ प्रशासनाने आता तरी या विषयाकडे गांभीर्याने पाहून २० ऑगस्टपूर्वी अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी आणि केंद्राचे कामकाज सुरू करावे. अन्यथा २० ऑगस्टनंतर आम्ही उपोषणाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू.”
— दिवाकर गमे, ओबीसी आंदोलन
यावेळी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दिवाकर गमे यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. २० ऑगस्टपर्यंत अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती झाली नाही आणि अध्यासन केंद्राचे कामकाज पूर्णपणे सुरू झाले नाही, तर दिवाकर गमे यांच्यासोबत उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेले अध्यासन केंद्र वर्षानुवर्षे बंद ठेवणे, त्याची दुरवस्था होऊ देणे आणि नियुक्तीची जाहिरात प्रसिद्ध करूनही वर्षभर प्रमुखांची नियुक्ती न करणे यापुढे सहन केले जाणार नाही. विद्यापीठ प्रशासनाने आता तरी जागे होऊन २० ऑगस्टपूर्वी अध्यासन केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी, केंद्राची स्वच्छता व देखभाल करावी आणि अध्यासन केंद्राचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करावे.
अन्यथा २० ऑगस्टनंतर NSUI, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि दिवाकर गमे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल.महात्मा फुले यांच्या विचारांचा अवमान सहन केला जाणार नाही; अध्यासन केंद्र सुरू होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील!






