आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी
पुणे प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आज सायंकाळी ६ वाजता आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या २३५ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती (SPPU युनिट) व समविचारी विद्यार्थी संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून करण्यात आली. यावेळी भटके-विमुक्त अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. संजय कोळेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी संतोष मदने सर, सतीश वाघमारे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक शेलकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीकांत कांबळे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी पवन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. संजय कोळेकर यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याचा व इतिहासाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, भारतीय इतिहासात भटके-विमुक्त समाजातील क्रांतिकारकांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिले आहे. वंचित, शोषित आणि Subaltern समाजाचा इतिहास मुख्य प्रवाहात येणे आवश्यक आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या भटक्या जाती-जमातीतील लढवय्यांना “चोर” म्हणून नव्हे, तर खरे स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले गेले पाहिजे. तसेच भटके-विमुक्त समाजाने सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाच्या मूल्यांशी बांधिलकी ठेवत आंबेडकरी चळवळीशी अधिक व्यापक संवाद व सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राहुल ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारी वारशाला अभिवादन करत बहुजन महामानवांच्या परिवर्तनवादी विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमात मयूर जावळे, अभिजित जाधव, दत्ता तर्फेवाड, पवन जाधव, बसवराज सोनकांबळे, सूरज चव्हाण, सम्यक गायकवाड यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते





