नेहा बोरा यांचा ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उत्साहात संपन्न
पुणे, दि. २६ : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर संवाद साधत देशातील शिक्षण व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर प्रखर भाष्य केले.
दुपारी १२ ते २ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात ‘विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी नेहा बोरा यांनी विद्यापीठ परिसरातील सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना भेट देऊन अभिवादन केले. तसेच मुख्य इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या शिल्पसृष्टीची पाहणी करून त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना नेहा बोरा यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक गंभीर प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. शिक्षणाचा अधिकार आणि संधी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्वीच्या पिढ्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून देताना त्यांनी महिला, दलित आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांची दारे खुली होण्यामागे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि फातिमा शेख यांच्यासारख्या समाजसुधारकांचा मोठा संघर्ष असल्याचे सांगितले.
पुण्यातील भिडे वाड्याच्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी महिला आणि वंचित घटकांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सामाजिक व्यवस्थेवरही भाष्य केले. “शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी खुल्या ठेवणे ही केवळ शैक्षणिक बाब नसून सामाजिक न्यायाची लढाई आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशातील युवकांनी जात, धर्म, लिंग आणि भाषेच्या आधारावर होणारे विभाजन नाकारून समानता, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहनही नेहा बोरा यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक तसेच विद्यापीठ आणि पुणे शहरातील विविध आंबेडकरी व पुरोगामी विद्यार्थी संघटना आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएच.डी. संशोधक सीमा वानखेडे, नितीन आंधळे, अभिषेक शेलकर, प्रथम तसेच वंचित बहुजन आघाडीचे इंटरनॅशनल सेक्रेटरी राहुल गायकवाड यांनी आपली मनोगते आणि अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वरी आव्हळे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. राहुल ससाणे यांनी केले.
या ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन विविध आंबेडकरी व पुरोगामी विद्यार्थी पक्ष आणि संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये किरण बद्रे, दत्ता तरपेवाडा, अभिषेक शेलकर, अरुण जाधव, सुरज चवणे, श्रीकांत कांबळे, अभिजीत जाधव, सुमेध चंदनशिवे आणि प्रतीक्षा वाघमारे यांच्यासह अनेक विद्यार्थी व संघटना प्रतिनिधींनी सक्रिय योगदान दिले.






