महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची नियुक्ती; आंदोलनाला मोठे यश
पुणे | १८ ऑगस्ट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रमुखाविना बंद अवस्थेत होते. महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या या महत्त्वपूर्ण अध्यासन केंद्राला पूर्णवेळ प्रमुख मिळावा आणि त्याचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम प्रभावीपणे सुरू व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करण्यात आले. अखेर विद्यापीठ प्रशासनाने अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची निवड केल्याने या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
अध्यासन केंद्रप्रमुखांच्या निवडीसाठी विद्यापीठाने जुलै २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविले होते. मात्र अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊनही जवळपास वर्षभर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे अध्यासन केंद्राचे कामकाज ठप्प राहिल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रश्नावर ज्येष्ठ ओबीसी कार्यकर्ते प्रा. दिवाकर गमे यांनी आक्रमक भूमिका घेतली. NSUIचे सिद्धांत जांभुळकर यांच्यासह त्यांनी अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली. यापूर्वी २४ जून २०२५ रोजी NSUIच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला.
दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी विद्यापीठ प्रशासनाला पत्र देऊन २० ऑगस्टपर्यंत अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. दिवाकर गमे आणि सिद्धांत जांभुळकर यांनी याच मागणीसाठी २० ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या सातत्यपूर्ण आंदोलनाची आणि इशाऱ्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने अखेर महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची निवड केली.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले अध्यासन केंद्र पुन्हा प्रभावीपणे कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार, संशोधन, व्याख्याने, परिसंवाद, विद्यार्थी मार्गदर्शन आणि सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम पुन्हा नियमितपणे सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या आंदोलनात NSUIचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, सिद्धांत जांभुळकर, विकास अवचार, ओंकार बिनवडे, अविनाश राठोड, सुश्मिता हरणे, शकील शेख, संदीप गायकवाड आणि राहुल गुरधे यांच्यासह NSUIच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने सहभाग घेतला. तसेच डाप्सा संघटनेचे सागर सोनकांबळे व दगडू सोनकांबळे, तसेच विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाने व अभिषेक शेलकर यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
ज्येष्ठ ओबीसी कार्यकर्ते प्रा. दिवाकर गमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाच्या भूमिकेमुळे हा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडला गेला, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची निवड झाल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचे आंदोलनकर्त्यांनी आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे स्वागत करण्यात आले असून, आता अध्यासन केंद्राचे शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम नियमित व प्रभावीपणे सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
“हे यश केवळ एका नियुक्तीचे नसून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुरोगामी, समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांना संस्थात्मक पातळीवर पुढे नेण्यासाठी केलेल्या संघर्षाचे यश आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
Loading Viewer...






