महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी स्मारक समितीची कुलगुरूंसोबत भेट
पुणे | २४ सप्टेंबर २०२६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समितीच्या शिष्टमंडळाने आज विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी पुतळा उभारणीसंदर्भातील भूमिका आणि मागणी कुलगुरूंसमोर मांडली.
विद्यापीठाच्या अधिसभेत यापूर्वी महात्मा गांधी यांच्या पुतळा उभारणीसंदर्भात ठराव मंजूर झालेले असतानाही त्यावर अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समितीच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन अधिसभेने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून पुतळा उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली.
यावेळी कुलगुरू मा. प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यासंदर्भात त्यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
समितीने आपली भूमिका मांडताना सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या ज्ञानकेंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारला जाणे ही विद्यापीठाच्या गौरवाची गोष्ट आहे. कुलगुरूंच्या कार्यकाळात हा पुतळा उभारला गेला, तर ही विद्यापीठासाठी तसेच समितीसाठी अभिमानाची बाब असेल. आजच्या सामाजिक परिस्थितीत महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, सामाजिक सलोखा आणि मानवतेचे विचार समाजापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.
पुणे विद्यापीठ हे देशातील एक महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असून, अशा विद्यापीठाच्या परिसरात महात्मा गांधीजींचे स्मारक उभे राहिल्यास त्यांच्या विचारांचा संदेश केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता देशभर आणि जगभर पोहोचण्यास मदत होईल, अशी भूमिका समितीने यावेळी मांडली. या भेटीवेळी उल्हास दादा पवार, अन्वर राजन, इंदुमती जोंधळे, गोपाल दादा तिवारी, प्रशांत कोठारीया, महावीर जोंधळे, नितीन पवार, सिद्धांत जांभुळकर आणि राहुल गुरधे उपस्थित होते. समितीने पुतळा उभारणीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेने महात्मा गांधींच्या पुतळ्याबाबत ठराव मंजूर केलेला आहे. आता त्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन विद्यापीठाच्या मुख्य परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, हीच आमची अपेक्षा आहे. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि सामाजिक सलोख्याच्या विचारांचे स्मरण भावी पिढ्यांना व्हावे, यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरेल.”
–उल्हास दादा पवार, माजी आमदार, राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समिती :
महात्मा गांधींचे विचार आजच्या सामाजिक परिस्थितीत अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या ज्ञानपरंपरेत गांधीजींचे स्मारक उभे राहिल्यास विद्यार्थ्यांना आणि समाजाला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल. कुलगुरूंनी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभारणीसाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून, समिती त्याचा सातत्याने पाठपुरावा करेल.”
-अक्षय कांबळे, राज्य उपाध्यक्ष, एनएसयुआई






